खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिका निवडणुकी दरम्यान पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह ८ जणांना भाजपमधून निलंबित करण्यात आले असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी शनिवारी जाहीर केले.
उमेदवारी न मिळाल्याने बावडेकर यांनी शिवसेना शिंदे पक्षातून उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे त्यांच्यावर पक्षांने निलंबनाची कारवाई केली. तसेच रविंद्र ढगे, दीपक माने, अक्षय पाटील, प्रियानंद कांबळे, कल्पना कोळेकर, सोनाली साखरे व महेश साखरे या आठ जणांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
तसेच तासगाव नगरपालिका निवडणुकीवेळी पक्ष विरोधी कारवाया केल्या प्रकरणी संदीप गिड्डे-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
तासगाव नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, हे पॅनेल उभेच राहू नये यासाठी श्री.गिड्डे यांनी प्रयत्न केले. तसेच पॅनेल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी आघाडी असल्याचा बनाव केला. पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची ध्वनीफित जाहीर सभेत प्रसारित केली असता ही ध्वनीफित एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित असल्याचे सांगत चुकीची माहिती प्रसारित केली याबाबत पक्ष संघटनेत चर्चा होउन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले.

