खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जाती-जातीत तेढ निर्माण करत राजकीय पोळी भाजून राज्य अथवा देश पुढे जाउ शकत नाही. शिवशाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारच प्रगती साधू शकत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विचारावच कार्यरत आहे.
यावेळी तडीपार झालेल्या उमेदवाराबाबत समर्थकांनी घोषणाबाजी करूनही उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी स्वागत व आमदार इद्रिस नायकवडी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नउ वर्षांनी होत असल्याचे इच्छुकांना संधी देउ शकलो नसली तरी नजीकच्या काळात महामंडळ, राज्य व जिल्हा स्तरिय समितीमध्ये नाराजांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादीने अनुभवी, तरूण व महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे. शहराचा विकास करतांना सुस्थितीतील रस्ते, आरोग्य, वाहतूक कोंडी याचा प्राधान्याने विचार करावा लागतो. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अल्पसंख्याक समाजाला सोबत घेत असताना त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. दर्गा, मंदिर, चर्च, गुरूद्वार यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आमचा पक्ष सर्व जाती धर्माना एकत्र घेउन जाणारा पक्ष आहे. अठरा पगड जाती, बारा बलुतेदार या सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सरकारमध्ये प्रयत्नशील आहोत.
मिरज ही वैद्यकीय नगरी आहे. एकेकाळी नावाजलेले वॉन्लेस रूग्णालय सध्या बंद आहे. ते सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विभागाकडून प्रयत्न केले जातील. याशिवाय मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. चार निवडणुका झाल्या, तरी या प्रश्नांची सोडवणूक होउ शकली नाही. आमच्या विचाराचे लोक जर महापालिकेत निवडून आले तर हा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल.प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असावे असा आमचा प्रयत्न असून कवलापूर विमानतळासाठी पाठपुरावा केला जाईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्वासन यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण सुरू असताना तडीपार उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझी यांच्यावर पोलीसांनी गुरूवारी तडीपारची कारवाई केली आहे. याबाबत काझी समर्थकांनी पवार यांचे भाषण सुरू असतानाच जोरदार घोषणाबाजी केली. यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर आताच बोलता येणार नाही, कारण माध्यमातून वेगळेच चित्र प्रदर्शित होउ शकते. असे सांगत त्यांनी यावर जाहीर वक्तव्य टाळले.
या सभेसाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, संजयकाका पाटील, माजी महापौर किशोर जामदार, पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

