खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरजेमध्ये अजित पवार यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तडीपार उमेदवार आझम काझी समर्थकांनी दादांना साकडे घालत काझी यांच्यावर केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले.
यावेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारावर कारवाई करण्यात आली आहे.
मिरजेतील शोएब काझी, कुपवाडमधील सूरज शेख, विटा हद्दीतील राजाराम बोडरे आणि आटपाडी हद्दीतील जितेंद्र काळे टोळी अशा चार टोळ्यांना हद्दपार करण्यात आले. निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अजित पवारांनी भेट टाळली.!
हद्दपार कारवाईच्या पार्श्वभूमीवर काझी यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सभास्थळी काझी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. थेट हद्दपारीची कारवाई झाल्याने आझम काझी अजित पवार यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होता. त्यामुळे अजित पवार आझम काझीला भेट देणार का? याकडे लक्ष होते. मात्र, आझम काझीला अजित पवार यांनी भेटणे टाळलं. काझी उभा असलेल्या ठिकाणावरून न जाता दुसऱ्या मार्गाने अजित पवार व्यासपीठावर उतरून रवाना झाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गेल्या काही दिवसापासून जोरदार टीका होत होती.

