खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी, ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांच्या प्रचारार्थ समतानगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
समतानगर येथील प्रमुख चौकात झालेल्या या जाहीर सभेत बोलताना महादेव जानकर म्हणाले की, पप्पू कोळेकर यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे. बहुजन समाजाने कोणत्याही दबावाला किंवा आमिषांना बळी न पडता स्वाभिमानासाठी मतदान करावे, असे आवाहन केले.
“काँग्रेसचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता स्वाभिमानाचे राजकारण सुरू आहे. सत्ता ही पैशावर नाही तर जनतेच्या विश्वासावर उभी राहिली पाहिजे.”
भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत जानकर म्हणाले की, थेट फोन करून पैसे देण्याची आमिषे दाखवली जात आहेत. मात्र आपण अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना जानकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रासप आणि वंचित आघाडीने नगरपालिका निवडणुका लढवल्या आहेत. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणे हेच पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करताना जानकर म्हणाले की, काही चूक झाली तर जाब विचारणारा मी स्वतः असेन आणि महिन्यातून एकदा सांगली दौरा करेन, ही माझी ग्वाही आहे.
या सभेला माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, डॉ. जयपाल चौगुले, प्रणव पाटील, अजित पाटील, डोंबाळे सर, प्रकाश टिळे, अजित दुधाळ, डॉ. विक्रम कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेची प्रस्तावना सत्यजित गलांडे यांनी केली. प्रभाग क्रमांक सातमध्ये निवडणूक रंगात आली असून, पप्पू कोळेकर यांच्या प्रचारसभेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

