खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सांगली दौऱ्यावर आहेत. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौकात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत राहून कुरघोड्यांचे राजकारण करणाऱ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय बोलणार.? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या शुक्रवार (दिनांक ९ ) रोजी मिरजेत प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी व माजी महापौर किशोर जामदार उपस्थित होते.
जगदाळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय सांगली मिरज व कुपवाड महापालिकेत कोणाचाही महापौर होणार नाही. मात्र कोणत्या पक्षासोबत जायचे, याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल. महापालिका क्षेत्रात एकूण ३३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असून सर्वच उमेदवार निवडून येण्याच्या स्थितीत आहेत. इतर पक्षांनी ७८ जागांवर उमेदवार देऊन सत्ता स्थापन होतेच असे नाही, असा टोलाही यावेळी जगदाळे यांनी भाजपला लगावला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मिरजेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव व राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ४ चे उमेदवार शिशिर जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.

