खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत २५ हजार ११९ संभाव्य दुबार नावे होती. मतदार यादीत संभाव्य दुबार मतदारांपुढे डबल स्टार अशी खूण होती. महापालिका प्रशासनाने अशा काही मतदारांची पडताळणी केली असता यातील सुमारे २ हजार ५६४ मतदार दुबार नसल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत २ हजार ५६४ मतदारांच्या नावांपुढील डबल स्टार हटवण्यात आला आहे. अन्य संभाव्य दुबार मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचा अर्ज मतदानावेळी भरून घेतला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीसाठीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने विधानसभेची मतदार यादी फोडून प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली होती. महापालिका क्षेत्रातील एकूण २० प्रभागात एकूण ४ लाख ५४ हजार ४२८ मतदार आहेत. या मतदार यादीत २५ हजार १२९ संभाव्य दुबार नावे होती. या मतदारांपुढे डबल स्टार अशी खूण करण्यात आली होती. यात सर्वाधिक ६ हजार ७०१ दुबार नावे सांगलीतील प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये, तर सर्वात कमी ५ हजार ५२४ दुबार नावे कुपवाडच्या प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये होती.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने संभाव्य दुबार मतदारांची बीएलओंच्या माध्यमातून पडताळणी सुरू केली. प्रारूप यादीत डबल स्टार असलेल्या काही मतदारांनी स्वत:हून महापालिकेकडे अर्ज करून कोणत्या प्रभागात मतदान करणार असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, संभाव्य दुबार मतदारांचा मतदान ओळखपत्र नंबर व आधार कार्ड नंबर तपासण्यात आले. यात सुमारे २ हजार ५६४ मतदार दुबार नसल्याचे आढळून आहे. एकसारखे नाव असले तरी व्यक्ती वेगवेगळी असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे संभाव्य दुबार मतदार नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती महापालिकेने निवडणूक आयोगाला पाठवली आहे. पडताळणी झालेल्या काही संभाव्य दुबार मतदारांपैकी २ हजार ५६४ मतदार हे दुबार नसल्याचे आढळून आले.

