मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे मिरज विधानसभा क्षेत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ याच्या निषेधार्थ ढकलगाड्यावरती मोटरसायकल व गॅसच्या टाक्या ठेवून त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रा. इनामदार यावेळी बोलताना म्हणाले देशातील जनतेला खोटी दिवा-स्वप्ने दाखवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. देशातील महागाईचा दर वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, हिन्दु-मुस्लिमातील दुरावा वाढत आहे, मागासवर्गीयावरील अन्याय आत्याचार वाढत आहे.
प्रतिवर्षी २ कोटी रोजगार देतो असे आश्वासन त्यांनी दिले होते, जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करतो असे आश्वासन दिले होते, पण तसे न करता आज गॅसचा दर १०२०/- झाला आहे, पेट्रोल १२२/- झाले आहे, डिझेल १०५/- झाले आहे, खादयतेल २००/- झाले आहे. पण या महागाई वरती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चकार शब्द काढायला तयार नाहीत, त्यांनी या देशाची माफी मागावी व नैतिकता स्वीकारून आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा… आम्ही या महाराष्ट्रात पंतप्रधानांना फिरू दिले जाणार नाही, असे जाहीर आवाहन मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांनी बोलताना केले. या प्रसंगी कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, महिला तालुका उपाध्यक्षा जुबेदा मुजावर, सरचिटणीस श्री. जैलाब शेख, महिला कार्याध्यक्षा सौ. सुप्रिया तोडकर, श्री. जावेद मणेर, ओबिसि सेल चे तालुका अध्यक्ष श्री. शब्बीर मुल्ला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीला चारचाकी ढकलगाड्यावरती पेट्रोल नसलेने मृत अवस्थेतील मोटरसायकल व गॅस नसलेली मोकळी टाकी, यांच्यावरती कफन घालून, गुलाल टाकून त्यांना हार अर्पण करून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात यावी आणि केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाची घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.

