खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
‘दिवाळीचे साहित्य हिंदूंच्याच दुकानांतून खरेदी करावे,’ अशा अशयाचे वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी एका आंदोलनादरम्यान केले. याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आली आहे.
जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जगताप यांच्यावर पक्षाकडून केव्हा कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आमदार जगताप यांनी करमाळा येथील आंदोलनात भाषण करताना ‘हिंदूंच्याच दुकानांतून दिवाळीचे साहित्य खरेदी करावे. नफा फक्त हिंदू समाजातील लोकांनाच झाला पाहिजे,’ अशा आशयाचे वक्तव्य केले. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले की, नगरमध्ये अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तेथे सर्व काही सुरळीत होते.
आता मात्र काही लोकांनी आपली जबाबदारी वाढली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आमदार जगताप यांच्या वडिलांचे छत्र हरपले आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवे. यापूर्वीही त्यांना मी समजावून सांगितले होते; परंतु त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे त्यांची भूमिका, विचार पक्षाला मान्य नाही. म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल.
दरम्यान, जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होईल, असे यापूर्वीच बोलले जात होते. तथापि, त्यांना समज दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता मात्र जगताप यांच्या भूमिकेत बदल होत नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा इशारा पवार यांनी दिला आहे.