खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर 125 नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे रणनीती ठरवण्यात येणार आहे. मात्र ही रणनीती ठरत असतानाच भाजपकडून काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा होणारा असून यानंतर पदाधिकाऱ्यांना निवडणुकी बाबत फडणवीस काही सूचना करणार आहेत. मात्र ही बैठक सुरू असताना काँग्रेस मधून भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.
पालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, त्यानुसार पक्षाने प्रभागनिहाय सर्व्हे आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मागील २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९७ नगरसेवक विजयी करत बहुमत मिळवले होते, तर आता २०२५ च्या निवडणुकीत १६५ एकूण जागांपैकी १२५ चा टार्गेट ठेवण्यात आला आहे. यासाठी पक्षाने इतर पक्षांमधून अनुभवी उमेदवार आयात करण्यावर भर दिला असून, काँग्रेसमधील पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश लवकरच घडणार असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार, पुणे शहर ४१ प्रभागांमध्ये विभागले गेले असून, यापैकी ४० प्रभागांतून प्रत्येकी चार नगरसेवक आणि एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत.या रचनेच्या आधारे भाजपने प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार करण्यास सुरवात केली आहे.
पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेनुसार, मागील निवडणुकीतील ४० जागा धोक्यात असल्याचे निदर्शनास आले असून, त्या प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार नसल्यास इतर पक्षांमधून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेऊन ठाकरे गटाला धक्का दिला होता. या नगरसेवकांमध्ये विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगिता ठोसर आणि प्राची आल्हाट यांचा समावेश होता.
म्हणून लांबला पक्षप्रवेश…
‘मिशन १२५’ अंतर्गत काँग्रेसमधील पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवण्याचा विचार सुरू असून, यानंतर आणखी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हे प्रवेश घडविण्यापूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे समजूत काढण्यात वेळ जात असल्याने हे प्रवेश लांबले आहेत अन्यथा हे प्रवेश आजच घडवून आणण्यात येणार होते असे देखील सांगितले जात आहे.