खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे युती केली जाईल. जेथे शक्य नाही तेथे स्वतंत्र लढायचे असले तरी स्थानिक नेते याचा निर्णय घेतील. पण स्वतंत्र निवडणूक लढवताना मित्रपक्षावर टोकाची टीका करू नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. ११) पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेतली. त्यात मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती. आता काय परिस्थिती आहे ? युती संदर्भात काय भूमिका आहे ? कार्यकर्त्यांची अडचण काय आहे.? हे आम्ही हे समजून घेतले आहे. पक्षाची संघटना म्हणून बूथ रचना, निवडणुकीची संघटना यावर चर्चा करून पुढचे दिशा निर्देश दिले आहेत. आजच्या बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, माजी नगरसेवक उपस्थित होते. अतिशय सकारात्मक परिस्थिती आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
ज्या ठिकाणी शक्य असले तेथे युतीचा प्रयत्न केला पाहिजे. जेथे शक्य नसेल तेथे स्वतंत्र लढायचे. जरी स्वतंत्र लढायचे असले तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही. त्या ठिकाणाच्या परिस्थितीप्रमाणे आमचे पदाधिकारी चर्चा करत आहेत. त्यामुळे याचा निर्णय आता स्थानिक पातळीवर चर्चा होईल.
जैन मुनींनी कटेंगे तो बटेंगे, फडणवीस हे आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले असे वक्तव्य केले याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ते काय बोलले मी ऐकले नाही. पण आम्ही जैन मुनींनी आम्हाला अहिंसेचा मार्ग, अपरिग्रह मूल्य शिकवले आहे. त्याचा मी नितांत आदर करतो.
फडणवीसांनी केले ठाकरेंचे स्वागत
शेतकऱ्यांना वेळेत मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना सरकार मदत देणार आहे हे ठाकरे यांनी मान्य केल्याने मी त्यांचे स्वागत करतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
बाहेरच्यांना सामावून घेतल्याने मोठा पक्ष
‘अन्य पक्षातील कोणताही स्ट्राँग कार्यकर्ता भाजपमध्ये आला तर त्याला प्रवेश देण्याची पक्षाची भूमिका आहे. साधारणपणे भाजपमध्ये जे जे बाहेरून आलेले आहेत त्यांना आमचे कार्यकर्ते सामावून घेतात. त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे. एखाद्यावेळी कोणाच्या प्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज झाले तर त्यांची समजूत आम्ही काढतो आणि ते त्यांना समजत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचे समर्थन केले.
पक्षप्रवेश करून स्वबळावर निवडणूक लढणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर मित्रपक्षांसोबत युती करायचा की नाही याचा निर्णय सोपविला आहे. तसेच त्यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाला परवानगी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून माजी नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात आहेत. शहरातील भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना उमेदवारीचे आश्वासन मिळावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत.
वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. फडणवीस यांच्या आजच्या भूमिकेमुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.