खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीतील दोघांना एकाने ७ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सुनील सहदेव टाकवडे (रा. कोकणे गल्ली, मिरज) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर माधव सुधीर बेरा व सुधाकर सुरवसे यांची फसवणूक झाली आहे.
सांगलीतील व्यावसायिक माधव बेरा, सुधाकर सुरवसे व सुनील टाकवडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुनील टाकवडे याचे सांगलीत एका रुग्णालयात मेडिकल आहे. त्याने दोघांना होलसेल मेडिकलचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार दोघांनी सुनील याला ७ लाख ७९ हजार रुपये दिले होते. परंतु रक्कम घेऊनही होलसेल मेडिकलचा व्यवसाय सुरू झाला नव्हता. त्यामुळे बेरा आणि सुरवसे यांनी त्याच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. वारंवार मागणी करूनही मेडिकलचा व्यवसाय सुरू होत नसल्याने फसवणूक झाल्याचे दोघांच्या लक्षात आले.
त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. त्यानंतर सुनील याने ३ लाख ४० हजार रुपये दोघांना परत केले. परंतु उर्वरित ३ लाख ३९ हजार रुपये परत न देता त्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.