खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दामदुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवत एका शेतकर्याची 9 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी रामजी चंद्रकांत व्हनमाने (वय 31, रा.पंचायत समितीपाठीमागे, आटपाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय नारायण पाटील (वय 50, व्यवसाय-शेती, रा. पुजारवाडी, आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित व्हनमाने याने 5 फेब्रुवारी 2021 ते 2023 या कालावधीत त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, तर अडीच वर्षांत दामदुप्पट रक्कम करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडलेल्या विजय पाटील यांनी मनमंदिर बँकेच्या आटपाडी शाखेतील आपल्या ऑनलाईन खात्यातून व्हनमाने याच्या खात्यावर 9 लाख 73 हजार रुपये रक्कम पाठवली. मात्र ठरल्याप्रमाणे कोणतीही परतफेड न करता व्हनमाने याने ही रक्कम हडप केली.