खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
‘मोका’ अंतर्गत अकलूज (जि. सोलापूर) येथील गुन्हेगारी टोळीवर झालेली कारवाई रद्द करण्यासाठी 65 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याच्या अटकेसाठी सोलापूर ग्रामीणच्या दोन पथकांनी कोल्हापुरात ठाण मांडले आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सहायक फौजदार नलावडे याला निलंबित करून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. संशयित नलावडे याचे कुटुंबीय, नातेवाईक, विश्वासातील मित्राकडेही शोध पथकातील अधिकार्यांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. दोन दिवसांपासून दोन्ही पथकामार्फत संशयिताचा कोल्हापूरसह परिसरात शोध सुरू आहे. नलावडे याने मोबाईल स्विच ऑफ केल्याने शोधमोहिमेत अडथळे येत आहेत. तरीही संशयिताला लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, असे अकलूजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांनी सांगितले. नलावडे प्रकरणाची पोलिस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठस्तर चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.