खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कर्नाटकातून घरफोडी करून सोने चांदीसह दीड कोटींचा मुद्देमाल घेऊन पळून जाणाऱ्या नेपाळ मधील आंतरराष्ट्रीय टोळीला विटा पोलिसांनी पकडले. ही कारवाई आज शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान भिवघाट (जि.सांगली) येथे करण्यात आली. याप्रकरणी संशयित नेपाळमधील राजेंद्र शेर बम (वय ३०), एकेंद्र कटक बडवाल (वय ३१) व करणसिंह बहादुर धामी (वय ३४, रा.सर्व रा.धनगेडी ता. आणि जि.कैलाली) या तिघांना पकडून कर्नाट कातील कोप्पा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, कर्नाटकातील शिवमूर्ती शेशाप्पा गोवडा (वय ५० रा. निकसे ता. आणि जि. चिक्कमंगरुळ) यांच्या घरातील सोन्या, चांदीचे आणि रोख रक्कम अशी मिळून १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत कर्नाटकातील कोप्पा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना २० ऑगस्ट रात्री ८:०० वा ते २१ऑगस्ट रोजी मध्यरात्री २.५१ वाजण्याच्या दरम्यान कर्नाटकातील निकसे गावात घडली.
आज शुक्रवारी या गुन्ह्यातील संशयीत हे एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीमधून विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यालयाकडून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना मिळाली. या नंतर लगेच ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पथकाला दिली. त्यानुसार विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग १६६ इ ) वर गस्त घालत असताना भिवघाट ते विजापूर रस्त्यावर एक पांढरी स्विफ्ट गाडी जाताना दिसली.
त्यावर पथकाने गाडीचा पाठलाग सुरू केला. या गाडीस ओव्हरटेक करुन पथकाने पकडले. त्यावेळी गाडीत एकूण ३ संशयित होते. गाडीच्या डीकीत एका पिशवीत सोन्या व चांदीचे दागिने आढळले. या संशयितांच्या ताब्यातील ८४ हजार १२५ रुपये किंमतीची चांदीची समई, तसेच आरती, मणी व इतर चांदीचे दागीन्यांचे एकूण वजन १ किलो २०१ गॅम ७९० मिली ही चांदी १ किलो ७० हजार रुपये, सोन्याचे वेगवेगळे डिझाईन असलेले १ किलो ८०२ ग्रॅम ३८० मिली वजनाचे दागीने, १० ग्रॅम मोत्यांचे दागीने ज्यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असे एकूण १ कोटी ४४ लाख १९ हजार ५० रुपये आणि पाच लाख रुपये किंमतीची संबंधित स्विफ्ट डिझायर गाडी (क्र के.ए.५३ ए .बी.५४६६) असे मिळून एकूण १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्दे माल त्यांच्या कडून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या तिन्ही संशयितांना कोप्पा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजीत कणसे,पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलीस हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेंमत तांबेवाघ, महादेव चव्हाण, अमोल नलवडे, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सागर कोकरे, गोरक्ष धुमाळ, सागर शिदे आणि सांगलीच्या सायबर सेलचे अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.