खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरात दरवर्षी विविध सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, व राजकीय पक्षांकडून सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात येतात. यंदा सीमेवरील जवानांना राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाकडून राख्या पाठवल्या आहेत. तसेच पोस्ट कार्डच्या माध्यमातून भावनिक पत्र लिहीत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
सीमेवरील रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवान भावांसाठी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे यांच्या पुढाकारातून राख्या पाठवण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा राधिका हारगे, उपाध्यक्षा तबस्सुम मुल्ला, अल्पसंख्यांक विभागाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा जुबेदा मुजावर, शीतल सोनवणे, सुजाता मोरे, सुरैया मुलाणी, अश्विनी उपाध्ये, नजमा मोमीन यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे म्हणाल्या, सीमेवरील जवान बांधव जसे देशाचे रक्षण करतात, तसे आपले कर्तव्य आहे देश रक्षणाचे. आपण प्रत्येकाने ठरविले की, पाण्याची बचत करणार, प्रदूषणावर आळा घालणार, प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, एवढे जरी केले तरी आपले देशसेवेसाठी खूप मोठे योगदान ठरेल. राख्या आणि लिहिलेले भावनिक पत्र सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांच्या पत्यावर स्पीड पोस्टने पाठवण्यात आले.