खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील येळावी- आमणापूर रोडवरील वैष्णोदेवी मंदिरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
सांगली जिल्ह्यातील आमणापूर येथील येळावी- आमणापूर रोडवर शशिकला जालिंदर मुळीक यांच्या खासगी जागेत वैष्णोदेवी मातेचे भव्य मंदिर आहे. दरम्यान सकाळी शशिकला मुळीक या नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेल्या असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला. जवळ जाऊन पाहिले असता कुलूप गायब झाल्याचे निदर्शनास आले. तर देवीच्या मूर्तीसमोर ताटातील पैसे तसेच होते, मात्र देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम गायब झाले होते. यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्हीत चोरटा कैद
मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच शशिकला यांनी याबाबत घरी माहिती दिली. यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे तीनच्या सुमारास एक चोर मंदिरासमोर दुचाकी लावून आल्याचे दिसले. त्याच्या हातात लोखंडी बारसारखे टोकदार हत्यार होते. त्याने कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दागिन्यांची चोरी करतानाचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान या घटनेची माहिती पलूस पोलिसांना देण्यात आली. यांनतर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तपासणी सुरू केली असून चोराला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे फिरवली जात आहेत. प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तर वैष्णोदेवी मातेचे अनेक मौल्यवान दागिने मंदीरात न ठेवता घरी सुरक्षित ठेवल्याने वाचल्याचे शकुंतला मुळीक यांनी सांगितले.