खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील (सिव्हिल चौक) व परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री उशिराने पाडण्यात आली.
यामध्ये खाद्य पदार्थ विक्री दुकाने,पान टपऱ्या, हॉटेल्स यासह छोटे मोठे व्यावसायिक हे अनधिकृतरित्या कच्चे – पक्के बांधकाम करून व्यवसाय करीत होते. अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून करण्यात आली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अतिक्रमण करून उभारलेल्या १३ अनधिकृत दुकानांवर महापालिकेने हातोडी चालवली. मिरज शहरातील अतिक्रमित जागेतील सर्व बांधकाम पाडले जाणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी सहाय्यक उपायुक्त अंनिस मुल्ला, अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर यांचेसह दोन्ही पथकातील १२ कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत ही मोहीम हाती घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
