परदेशी महिलेकडून साडेसात कोटींचे ‘क्रिस्टल मेथ’ जप्त, ‘डीआरआय’नं बस प्रवासादरम्यान केली कारवाई….
खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हि कारवाई करण्यात आली. ही महिला अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत असल्याची माहिती डीआरआय पुणे युनिटला मिळाली होती.
दिल्लीहून बेंगळुरूकडे बसने प्रवास करणाऱ्या एका परदेशी महिलेच्या बॅगेत लपवलेले अंमली पदार्थ जप्त करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे युनिटने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७ कोटी ६३ लाख रुपयांचे ३ किलो ८१५ ग्राम ‘क्रिस्टल मेथ’ जप्त करण्यात आले असून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हि कारवाई करण्यात आली. ही महिला अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत असल्याची माहिती डीआरआय पुणे युनिटला मिळाली होती. त्यानुसार, पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पथकाने संबंधित महिलेवर लक्ष ठेवले आणि तिला प्रवासादरम्यान थांबवून चौकशी करण्यात आली.
प्रारंभीच्या तपासणीत तिच्या जवळील बॅगेत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र, बसच्या मागच्या भागात लपवलेली तिची दुसरी बॅग सापडली. त्या बॅगेची बारकाईने झडती घेतली असता, सहा सलवार सूट आढळले. प्रत्येक सूटमध्ये खास डिझाइन केलेल्या कॅव्हिटीमध्ये पॉलिथिनमध्ये पांढऱ्या स्फटिकासारख्या पदार्थाचे पॅकेट लपवलेले आढळून आले.
या पांढऱ्या स्फटिकरूप पदार्थाची रासायनिक तपासणी केल्यानंतर त्यात ‘अॅम्फेटामीन’ असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३ किलो ८१५ ग्राम क्रिस्टल मेथ आढळून आले. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ७ कोटी ६३ लाख रुपये आहे. डीआरआयने संबंधित महिलेला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.