खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
आज सकाळी बालाजी हॉटेलपासून मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. काल रात्री मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर मनसेने कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच, असा ठाम पवित्रा घेतला असून सध्या मीरा रोडवर मनसे कार्यकर्ते आणि मराठी एकीकरण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघत आहे. हिंमत असेल तर अडवा, असे त्यांनी म्हटले आहे.
मीरा भाईंदर येथील मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही यावरून प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही? मीरारोडमध्ये जे सुरु आहे ते अत्यंत चुकीचं आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.
मला पोलिसांनी अडवून दाखवावे
आता मीरा रोडवर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर प्रताप सरनाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रताप सरनाईक आता मीरा रोडवर जायला निघाले आहेत. याबाबत प्रताप सरनाईक म्हणाले की, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. काल मराठी एकीकरण समितीचे नेते गेले तेव्हा त्यांना परवानगी नाकारली. काही लोकांना तडीपारीच्या नोटीसेस दिल्या. पोलीस आयुक्तांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे. मला पोलिसांनी अडवून दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.