सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीच्या मागे विलास कोळी या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मयत कोळी याच्या अंगावर दगडाने घाव घातल्याचे व्रण असल्याचे दिसत असल्याने संशय बळावला आहे. हा घातपात आहे की अजून काय याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
विलास कोळी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते विजयनगर परिसरातच राहतात. गेल्या दोन दिवसापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली होती. आज त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातील प्रशासकीय इमारतीच्या मागे असणाऱ्या मोकळ्या जागेतील एका झुडपात हा मृतदेह सापडला आहे.
घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी भेट देऊन पाहणी केली. याचबरोबर फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहावर दगडाने वार केल्याच्या खुणा दिसत असल्याने घातपाताचा संशयही व्यक्त केल जात आहे.


