खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सार्वजनिक आरोग्य विभागात अधिपरिचारिका या संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नती तसेच शहराच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
टेबलाखालूनची ‘दुकानदारी’ करण्याचा प्रताप आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अधिपरिचारिका संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नतीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील टेबलाखालून कारभार करणाऱ्या काहींनी स्वत:चा ‘उद्योग’ सुरू केला. पदोन्नती आणि इच्छितस्थळी बदली, पदस्थापना पाहिजे, असेल तर ३ लाख रुपये मोजा, अशी दुकानदारी सुरू झाली. जर पैसे दिले नाही तर ग्रामीण भागांत ‘ऑर्डर’ काढण्याची धमकीच देण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यातून काहींनी मनासारख्या नियुक्तीसाठी पैसे मोजल्याचे समजते.
अन्यथा, गंगाखेड येथे टाकू !
याप्रकरणी एका अधिपरिचारिकेने धाडस करून उपसंचालकांकडे हा प्रकार मांडला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली गेली. पैसे देण्याची इच्छा नसताना कार्यालयात बोलावून संबंधिताने ‘गंगाखेड येथे टाकू’ असे सांगितले. घाबरून पैसे द्यावे लागले, असे या अधिपरिचारिकेने नमूद केले.
किती वर्षांपासून हा उद्याेग? किती जणांकडून वसुली?आरोग्य विभागात नियमितपणे पदोन्नती, बदल्या होत असतात. त्यामुळे पदोन्नती आणि बदल्यांसाठी ‘वसुली’ करण्याचा प्रकार किती वर्षांपासून सुरू आहे? आतापर्यंत कोणाकोणाकडून ‘वसुली’ करण्यात आली? आदींचा आता शोध घेणे गरजेचे आहे. शिवाय हा प्रकार खालच्या स्तरावरील कर्मचारीच करतात की, त्यात वरिष्ठही सहभागी आहेत, असा प्रश्न आहे.
चौकशी समिती नेमली
याप्रकरणी आरोग्य उपसंचालक डाॅ. कांचन वानेरे यांनी चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. चौकशी होईपर्यंत याप्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यास करमाड येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
१५ दिवसांत येईल अहवाल
या प्रकरणी एक तक्रार आलेली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. ती १५ दिवसांत अहवाल देईन. चौकशी होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला करमाड येथे प्रतिनियुक्ती दिली आहे.
– डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ


