
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचं नेहमी ऐकतात अशी टीका शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी २ दिवसांपूर्वी केली होती.
आता यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घरात “अघोरी” पूजा केली असून याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.
वसंत मोरे म्हणाले, “भरत गोगावले यांच्या अकलेच्या निघालेले दिवाळे. रश्मी वाहिनी यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहे. गोगावले यांना प्रश्न आहे १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते? ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या? गोगावले यांनी ११ पुजारी बोलावून त्यांच्याकडून कशाला पूजा केली. बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या.”
‘निवडणूक होण्याच्या आधी गोगावले यांनी घरी अघोरी पूजा कशाला घातल्या. ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणलं जातं. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात १५ लाख रुपये एका पूजेला लागतात असा’, आरोप सुद्धा वसंत मोरे यांनी केला आहे.
‘महाराष्ट्रात जे अघोरी प्रकार घडतात, बगलामुखी हा अघोरी प्रकार आहे. निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होती, १ महिना आधी ही पूजा त्यांच्या घरात घातल्या गेली होती. आता अशा पूजा जर होणार असतील तर आम्ही याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत तक्रार करू’, असंही मोरे म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येणार का?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर वसंत मोरे म्हणाले, ” महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिक यांचे म्हणणे आहे की दोन्ही सेना एकत्र आल्या पाहिजेत. राज्यात येत्या निवडणुकीसाठी हा प्रयोग नक्कीच केला पाहिजे. एक पाऊल शिवसेनेने पुढे टाकलं आहे. आता येत्या गणेशोत्सवात याचा श्रीगणेशा झाला पाहिजे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


