
भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-वडोदरा कॉरिडॉर मार्गात भूसंपादन झालेल्या भिवंडी तालुक्यातील नादीठणे येथील शेतकऱ्याच्या जमिनीचा ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांचा मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटणाऱ्या गुन्ह्यात आतापर्यंत १७ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या गुन्ह्याच्या तपासात भिवंडी प्रांत कार्यालयातील निलंबित नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांचे नाव समोर आले आहे. गोसावी यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, ते फरारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांना २४ फेब्रुवारीला लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली होती. मात्र आता साडेअकरा कोटी रुपयांच्या प्रकरणात पुन्हा त्यांचे नाव आले आहे; परंतु ते फरारी असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी सांगितले. या प्रकरणात प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी व कर्मचारी अडकण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासात साखराबाई ऊर्फ अनिता वाघमारे व संतोष मोरे या दोघांची नावे समोर आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राऊत, नीलेश बडाख करीत आहेत.

