बेळुंखी (ता.जत) येथे रात्रीच्या वेळी ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. जत पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.
बेळुंखी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पांडुरंग चव्हाण यांच्या मळ्यात आंब्याच्या झाडाखाली ड्रोन पडल्याचे निदर्शनास आले. हा ड्रोन प्लास्टिकचा असून, वजनाला हलका आहे. त्यावर कॅमेरा आहे. त्यावर निळी लाइट आहे. अचानकपणे ड्रोन सापडल्याने बेळुंखी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज शिंगाडे यांनी जत पोलिसांना दिली. जत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी येऊन ड्रोनची पाहणी केली आणि तो ड्रोन ताब्यात घेतला.
सध्या भारतपाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असताना हा ड्रोन सापडल्याने गावात उलटसुलट चर्चा रंगली होती. हा ड्रोन कोणी सोडला, याची अद्याप माहिती कळू शकली नाही. याबाबत जत पोलिस निरीक्षक सतीश कोळेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या ड्रोनबद्दल नागरिकांनी भीती बाळगू नये. हा प्लास्टिकचा छोटा ड्रोन आहे. त्यावर कॅमेरा व लाइट आहे. या ड्रोनचा मालक कोण आहे व तो का सोडण्यात आला, याची चौकशी सध्या सुरू आहे.