खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कडेगांव तालुक्यातील महसूल प्रशासनाचे काही कर्मचारी चक्क वाळू तस्कराची चार चाकी गाडी घेऊन सहलीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून अवैध वाळू तस्कर आणि महसूल कर्मचाऱ्यांचा या नात्याला नक्की काय म्हणायचं ? म्हणजेच ये रिश्ता क्या कहलाता है? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार प्रयत्नशील असले तरी सेनापती एकनिष्ठ असून काय करणार मावळे फितूर असल्यावर युद्ध कसे जिंकणार ? अशी प्रतिक्रिया जनमाणसातून उमटत आहे.
कडेगांव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी हा काही नवीन विषय नाही मात्र धडाकेबाज प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांनी अवैध वाळू उपशावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी आजही कडेगांव हद्दीतील येरळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे . यंत्रांच्या सहाय्याने सुरू असलेला अवैध वाळू उपसा बऱ्यापैकी थांबला असला तरी ट्रॅक्टर, टेम्पो आणि चार चाकी गाड्यांमधून आजही वाळू उपसा सुरू आहे कारण या काही भ्रष्ट महसूल कर्मचाऱ्यांची साथ आहे.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार अजित शेलार यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे मात्र काही ठराविक भरारी पथक प्रमुख किंवा पथकातील कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू तस्करांशी अर्थपूर्ण तडजोड केली असल्याचे अनेकदा सिद्ध झालं आहे आणि त्यातच आता अशाच प्रकारे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या एका तस्कराची चार चाकी गाडी घेऊन एक भरारी पथक प्रमुख तर काही पथकातील काही कर्मचारी सहलीला गेल्याची माहिती समोर आली आहे. आजकाल आपले दोनचाकी वाहन कोणी कोणाला देत नाही मग जवळपास २० लाखांची चारचाकी सहलीला जाण्यासाठी कोण आणि का देईल?
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही आम्हाला मदत करा म्हणजेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे तालुक्यातील अवैध वाळू तस्कर आणि काही भ्रष्ट महसूल कर्मचाऱ्यांचा प्रवास सध्या सुरू असून हा प्रवास येरळा नदीच्या मात्र जीवावर उठणारा आहे. काही भ्रष्ट महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवैध वाळू तस्करांकडून आजही अवैध वाळू उपसा सुरू आहे.
फक्त वाहनच की सहलीचे प्रायोजकत्वच तस्कराकडे ?
महसूल कर्मचाऱ्यांना सहलीला जाण्यासाठी स्वतःचे फक्त वाहनच अवैध वाळू तस्कराने पुरवले आहे की सहलीचे प्रायोजकत्वच तस्कराकडे आहे ? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. ज्याने वाहन दिले त्याने गाडीला तेल आणि सहलीच्या खर्चाला पैसेही दिले नसतील कशावरून ? तर याबदल्यात आता येरळा नदीतून किती दिवस अवैध वाळू उपसा सुरू राहणार ? असे सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केले जात आहेत.
चौकशी होऊन कारवाई होणार का ?
अवैध वाळू तस्कराची गाडी घेऊन सहलीला जाणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची म्हणजेच शासनाची प्रतिमा मलिन केली आहे. अवैध वाळू तस्कर म्हणजे शासकीय मालमत्तेचे चोर आणि महसूल कर्मचारी म्हणजे शासकीय मालमत्तेचे रखवालदार . आता रखवालदारांनी चक्क चोराशी हातमिळवणी केल्याने शासनाची प्रतिमा कशी स्वच्छ राहील? त्यामुळे सदर घटनेची चौकशी होणार का ? आणि चौकशी होऊन दोषींवर शिस्तभंगाची कारवाई होणार का ? असा सवालही सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.