
- जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच आहेत अस वारंवार वक्तव्य शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत असते.
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या gopniykhabarya.live

राज्याचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत असले तरी आजही अनेकांच्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत किंवा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच आहेत अस वारंवार वक्तव्य शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत असते. अशातच शिवसेना बंडानंतर फेमस झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिंदेंचे कौतुक करत अजब लॉजिक सांगितले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शहाजी बापू पाटील सोलापूरात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःच्या पराभवावर भाष्य करताना अजब विधानं केली आहेत. जी सध्या चर्चेत आली आहेत.
- ‘मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते’
महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. कारण मी १९९५ ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी २०१९ ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असं लॉजिक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लावलं. तसेच, माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो मला माहिती नाही, अस शहाजी बापू पाटील यावेळी म्हणाले.
तसेच, गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे पडली.सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात पक्षाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली, त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली लढाई आहे. तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत, तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही.