
तासगांव प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात एका शेतकरी कुटुंबात मागील आठ महिन्यांपासून अचानक घरातील कपडे आपोआप पेटू लागले. अंगणात रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजा पेटू लागल्या. हे असे अचानक काय व्हायला लागले, म्हणून हे कुटुंब भयभीत झाले.

त्यांनी तासगाव पोलिस स्टेशनला धाव घेतली. हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सल्ला घ्या, असे तासगाव पोलिसांनी सांगितले आणि अंनिसने हा सारा प्रकार उघडकीला आणला.
पीडित कुटुंबाने सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याशी संपर्क साधून, घडणार्या घटना सांगितल्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून थोरात यांनी तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे, अमर खोत यांना, पीडित कुटुंबाला भेट द्यायला सांगितले. त्याप्रमाणे सुजाता म्हेत्रे आणि सुनीता म्हेत्रे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहिली. संपूर्ण कुटुंब भानामतीच्या दहशतीखाली होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वस्तूला, केव्हाही आग लागण्याची शक्यता असल्याचे सांगत होते.
घरातील सर्व मंडळींना एकत्र बसवून अंनिस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून घडणार्या प्रकाराची माहिती घेतली. तेव्हा समजले की, जवळपास आठ-नऊ महिन्यांपासून या अघोरी गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. चौथ्यांदा गंजी पेटली. घरावर दगड पडणे आणि त्यानंतर घरातल्या वस्तू आपोआप पेटणे सुरू झाले. महिलांचे दोरीवरील कपडे आपोआप पेटू लागले. घरातील काही महिलांच्या अंगावरचे कपडे आपोआप पेटणे सुरू झाले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. ही माहिती ऐकून घेतल्यानंतर काही परिस्थितीजन्य पुरावेही तिथे पाहायला मिळाले. जळालेले कपडे, जळालेल्या काही साड्या पण पाहायला मिळाल्या.
समितीच्या कार्यकर्त्यांनी एकेका व्यक्तीला समोर घेऊन प्रश्न विचारणे सुरू केले. शेवटी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ‘ पुन्हा अशा गोष्टी घडल्या, तर ताबडतोब कार्यकर्त्यांना कळवा, आम्ही परत येऊ.’ असा विश्वास दिला. आज या गोष्टीला दहा दिवस झाले पण कार्यकर्ते येऊन गेल्यापासून एकदाही तसा कुठलाच प्रकार घडला नाही. राहुल थोरात, वासुदेव गुरव, अमर खोत, नूतन परीट, सुनीता म्हेत्रे, सुजाता म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला.
करणी, भानामती असत नाही
अंनिस कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे म्हणाल्या की, घरावर दगड पडणे किंवा एखादी वस्तू पेटणे या पाठीमागे कोणतीही भानामती असत नाही. एखादी वस्तू जेव्हा हालचाल करते, त्यावेळेला तिला कोणती ना कोणती ऊर्जा द्यावी लागत असते. ही करणी, भानामती असत नाही, यापाठीमागे फक्त मानवी मेंदू आणि मानवी हातच असतात.