
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला उंब्रज पोलिसांनी मसूर फाटा येथील हनुमानवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. संशयिताकडून 60 हजारांचं सोन्याचं मंगळसूत्र आणि 25 हजारांची दुचाकी असा 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या चोरट्याने आठ गुन्हे केल्याचं तपासात उघड झालं.

संशयिताचं नाव संभाजी गोविंद जाधव (वय 38, रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असं आहे. 17 मार्च रोजी दुपारी उंब्रजच्या गोडवाडी रस्त्यावर एका महिलेला दुचाकीवर सोडण्याच्या बहाण्याने मध्येच उतरवून, जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील 60 हजारांचं मणिमंगळसूत्र चोरलं होतं.

या घटनेची तक्रार उंब्रज पोलिसांत नोंदल्यानंतर सपोनि रवींद्र भोरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मसूर फाट्याजवळील वीटभट्टी परिसरात संशयित दुचाकीसह उभा असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने चोरी कबूल केली.
संभाजीवर विटा, कराड, म्हसवड, शिरोळ आणि कवठेमहाकाळ येथे घरफोडी, चोरी आणि एटीएम फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. तो जामिनावर सुटलेला होता. कराड परिसरात हेल्मेट घालून निर्जन ठिकाणी फिरणाऱ्या महिलांचे दागिने चोरल्याचे आठ प्रकारही त्याने कबूल केले. पोलिसांनी कराड शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळून चोरलेली दुचाकीही हस्तगत केली.