आरपीआयचा अल्टीमेटम आला संपत
कडेगाव:- कडेगाव तालुक्यात सेवेत असताना अतिरिक्त सजेच्या ठिकाणी बेकायदेशीर नोंदी धरून तसेच वांगी येथील कांबळे कुटुंबियांकडून पैसे घेऊन त्यांचे काम न केल्याच्या तक्रारीवरून तलाठी दिलीप चौरे यांच्यावर कारवाई करून निलंबित करा अन्यथा आंदोलन करू असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडेगाव तालुका युवक आघाडीचे वतीने कडेगाव तहसीलदार यांना देण्यात आले होते. निवेदनात १० मे पर्यंत कारवाई करा असे नमूद करण्यात आलं होतं अन्यथा लाक्षणिक धरणे आंदोलन करणार असं नमूद करण्यात आलं होतं. १० मे आता जवळ येत असून निवेदनातील दोन तक्रादारांच्या तक्रारी प्रथमदर्शनी रास्त असल्याचं समोर येत असून त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं समजते. आता तहसील कार्यालय चौरेंवर कारवाईचा प्रस्ताव पाठवून आरपीआय कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करणार की आरपीआय कार्यकर्त्याना तक्रारदारांसह आंदोलन करावे लागणार हे सोमवारी ९ मे ला स्पष्ट होईल.
तलाठी दिलीप चौरे यांनी येतगाव आणि वांगी येथील अतिरिक्त कार्यभार असताना वांगी येथे दोन बेकायदेशीर फेरफार धरले असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे तर येथीलच कांबळे कुटुंबियांना वारस नोंदी साठी ६० हजार रुपये घेऊनही वारसनोंद न करता बेदखल केले आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देताना कांबळे कुटुंबियाने सगळी आपबीती महसूल अधिकाऱ्यांना सविस्तर सांगितली होती. तर येतगाव येथील झगडे कुटुंबियांच्या सातबारावर बेकायदेशीर वारसनोंद चौरे यांनी चढवली होती. या दोन्ही तक्रारी तहसील कार्यालयात यापूर्वीच दाखल करण्यात आल्या होत्या मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दोन्ही कुटुंबियांनी आरपीआयचा दरवाजा ठोठावला होता. आता या दोन्ही दाखल प्रकरणात तहसील कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे. झगडे कुटुंबीयांच्या प्रकरणात बेकायदेशीर वारसनोंद केल्याचे सर्कल चौकशी अंती स्पष्ट झाल्याचं समजते यावरून सदर फेरफार रद्द करण्यासाठी प्रांत कार्यालयात पत्रव्यवहार झाला असल्याचे समजते. तर कांबळे कुटुंबियांना नोटीस काढून त्यांची तक्रार सुनावणीस ठेवली आहे.
तक्रारीतील उर्वरित दोन बेकायदेशीर नोंदी बाबत कोणीही एक अक्षर काढण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. याबाबत चौकशी अधिकारी नेमने गरजेचं असून याबाबत काय होतंय हे लवकरच स्पष्ट होईल. सदर प्रकरणांमध्ये लेखी आश्वासन मिळाल्यास आरपीआय आंदोलन स्थगित करेल अन्यथा प्राथमिक टप्प्यात लाक्षणिक धरणे आंदोलन होणार असे समजते.

