
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या १८ लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा २४० कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार, अशी चर्चा होती. पण, महिलांची ५० टक्के सवलत योजना बंद होणार नाही. तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘खबऱ्या’शी बोलताना दिले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जातात. दुसरीकडे महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा सुमारे २४० कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागतात. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा तीन हजार ८०० कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट दराची सवलत बंद होणार, अशी चर्चा सुरू आहे.
सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होतो आणि त्यामुळे महामंडळासमोरील देखील अडचणी निर्माण होतात असेही त्या चर्चेमागे कारण होते. पण, महिलांसाठीची ५० टक्के तिकीट दराच्या सवलतीची योजना बंद होणार नाही, अशी माहिती खुद्द परिवहन मंत्र्यांनी दिली आणि त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह राज्यातील सर्वच महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत योजना सुरू आहे. सवलत योजना कायम राहील. ती बंद करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही.
- – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री