
सांगली | रस्त्यावर अनेक लहान मुले नशा करताना नजरेस पडत आहेत. अशात सांगली शहरात शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पालकांनीच शाळकरी मुले सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचे चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.हा प्रकार समोर आल्याने जणू काही शहरात नशेचा बाजार मांडला गेला असल्याचे बोलले जात आहे.

आजघडीला नशा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी मोठ्यांपासून ते महाविद्यालयीन मुलांसह शाळकरी मुले देखील नशा करत असल्याचे समोर आले आहे. यात सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका उद्यानात भर गर्दीत सात ते आठ मुले गोल करून वेप हुक्का ओढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शाळकरी मुले देखील नशेच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

- उद्यानातच नशेचा बाजार
शाळकरी विद्यार्थी नशा करण्यासाठी थेट शहरातील उद्यानांमध्ये येत आहेत. एका ठिकाणी बसून सात ते आठ जण नशा करत गोंधळ घालताना दिसत आहेत. अर्थात ज्याठिकाणी नागरिक थोडी शांतता किंवा विरंगुळा करण्यासाठी येत असतात. त्याच ठिकाणी नशेचा बाजार सुरु असल्याने नागरिकांनी आता जायचे कोठे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
- पोलिसांनी पहारा ठेवण्याची मागणी
नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या बागा, उद्याना व नदीकाठच्या घाटापर्यंत पोलिस पहारा ठेवावा; अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. तसेच उद्यानांमध्ये चाललेल्या या प्रकारावर अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या या वस्तू येतात कशा? याचा शोध आता घ्यावा अशीही मागणी होत आहे.