कडेगाव येथील कापड दुकानात वृद्धाला साडीने बांधून सोन्याचे दागिने व दुचाकी चोरणार्या चोरट्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील तिघांना अटक करण्यात आली.
चोरट्यांकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्रज्ज्वल नरेश मातनकर (वय 20), अभिषेक सुधाकरराव बोडखे (22) व ओम प्रवीण घाटोळे (19, सर्व रा. मोर्शी, जि. अमरावती) अशी संशयितांची नावे आहेत.
कडेगाव येथील सिद्धनाथ कॉम्प्लेक्समध्ये नामदेव कृष्णा करडे यांचे कापड दुकान आहे. 28 सप्टेंबररोजी सकाळी तिघांनी चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठ्या लंपास केल्या. या जबरी चोरीचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त केले. पथकातील हवालदार अरुण पाटील व सूरज थोरात यांना चोरटे मोर्शी (जि. अमरावती येथील असल्याची माहिती मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोर्शी गाठले. तेथील रामजीबा मंदिराजवळ संशयित थांबल्याचे दिसून आले. पथकाने संशयित तिघांना ताब्यात घेतले.
प्रज्ज्वल मातनकर याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, तो कडेगाव येथील कापड दुकानात कामाला होता. फिर्यादीने पगाराचे पैसे न दिल्याने साथीदारांच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली.