पुणे – राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला चार तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तो आज संपत आहे. त्या अनुषंगाने राज्यात 30 हजारहून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले असून आतापर्यंत 13 हजार लोकांना 149 ची नोटीस देण्यात आली आहे.
कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे तिरुपती बालाजीला गेल्याचे समजत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महासंचालकांनी दिलेल्या आदेशानूसार शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यात येत आहे. राज्यभर जी कार्यवाही सुरु आहे तीच कार्यवाही पुणे शहरातही सुरु आहे. दरम्यान कायदा सुव्यस्थेची जबाबदारी असलेल्या सह आयुक्तपदी संदीप कर्णीक यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. त्यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
राज्यभरात मनसेच्या 25 ते 30 हजार कार्यकर्त्यांना विविध कलामांतर्गत पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. पुणे शहरात 700 ते 800 मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा आल्या आहेत. यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही समावेश आहे. या सर्व नोटीसांना मनसेच्या लीगल सेलमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात येत आहे — किशोर शिंदे ( मनसे नेते, पुणे शहर)

