- बस थांब्याजवळ डंपरची दुचाकीला धडक..!
इस्लामपूर – गोपनीय खबऱ्या | पेठनाका (ता. वाळवा) येथील बस थांब्याजवळ डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वकील वैशाली प्रशांत कांबळे-देशमुख (रा. वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तेजस्विनी आनंदराव देसाई (वय 27, रा.शिरटे) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी घडला. इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवारी दुपारी वैशाली व तेजस्विनी या दुचाकीवरून (एमएच 09 ईई 5738) काळमवाडी येथे गेल्या होत्या. दोघी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरकडे निघाल्या होत्या. पेठनाक्याजवळील बसथांब्याजवळ बसला ओलांडून पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला डंपर ने (एमएच 10 डीटी 4087) धडक दिली. वैशाली या डंपरच्या चाकाखाली सापडल्या. अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या तेजस्विनी देसाई गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच वकील संघटनेच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेजस्विनी यांच्यावर इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा पोलिसांनी तेजस्विनी यांचा जबाब नोंदवला.

