गोपनीय खबऱ्या – जत प्रतिनिधी | विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह पोषण आहाराकरिता आणलेला ४०० किलो तांदूळ चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमधून समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील याबाबत मुख्याध्यापक भीमसेन नामदेव नागणे यांनी जत पोलिसात तक्रार दिली असून जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कोसारी या प्रशालेत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रधानशक्ती माध्यान्ह पोषण आहार या योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून दिला जातो. याकरिता शासनाने दिलेला तांदूळ प्रशालेतील व्हरांड्यातील कोठीमध्ये साठा केलेला होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शाळा उघडत असताना तांदळाच्या कोठीचे कुलूप तुटलेले दिसले.

शालेय परिसरात तांदळाचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तांदूळ सापडला नाही. मुख्याध्यापक नागणे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या आधी कोसारी जिल्हा परिषद शाळेत जूनमध्ये संगणक प्रिंटर, सौरऊर्जेच्या बॅटऱ्या, माईक, स्पीकर, तांदूळ असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत सुद्धा जत पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशातच पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमधील तांदळाची चोरी झाली आहे. चोरट्यावर पोलिसाचा वचक राहिला नाही. चोरट्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांतून होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.