कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कुपवाड परिसरातील बामनोली हद्दीत दत्तनगर येथे गुटखा व सुगंधी तंबाखू पॅकिंग करणाऱ्या कारखान्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचेकडून संयुक्त छापा टाकण्यात आला.
गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्तिक मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर पोलीस यंत्रणा ॲक्टिव मोडवर दिसून येत आहे. मिरज- म्हैशाळ रस्त्यावर, अंकली फाटा येथे याअगोदर मागील आठवड्यात तसेच दोन तीन दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. आता पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने अवैध धंदेवाल्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
यामध्ये पॅकिंग करणाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३ मशनरी व पोत्यांमध्ये साठा करण्यात आलेली सुगंधित तंबाखू असा एकूण माल तब्बल २० लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासहित कर्मचारी कारवाईत सहभागी होते.


