मुंबई प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून शिस्तभंगाची पहिली कारवाई करण्यात येणार आहे. विजय शिवतारे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेकडून त्यांना पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईची नोटी पाठवली जाणार आहे.
विजय शिवतारे यांना आजच शिवसेना पक्ष शिस्तभंग कारवाईची नोटीस मिळणार आहे. शिवतारे यांनी पक्षाचा आदेश मानला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. 12 तारखेला 12 वाजता आपण बारामती लोकसभेतून उमेदवारीचा फॉर्म भरणार आहोत, असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. तसंच त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांवरही घणाघाती टीका केली.
विजय शिवतारे यांची शिवसेना नेत्यांनीही अनेकवेळा समजूत काढली, तसंच शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावलं होतं. या भेटीनंतरही विजय शिवतारे यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता त्यांच्यावर शिस्तभंगांची कारवाई करण्यात येणार आहे.
शिवतारेंच्या भूमिकेमुळे राज्यात इतर ठिकाणीही महायुतीत कटुता येऊ शकते, त्यामुळे विजय शिवतारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. महायुती धर्म न पाळल्यास निवडणुकांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं, अशी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

