गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक वातावरण चांगलंच तापलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय समोर आणल्यानंतर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, आता ठाकरे सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतल्याचं समोर येतंय…
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला होता. त्यासाठी 3 मे पर्यंतची डेटलाईन दिली आहे.. त्यानंतर मात्र थेट कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे..
दरम्यान, पोलिस आयुक्त पांडे यांनी नाशिकमध्ये भोंग्यांसंदर्भात दिलेल्या आदेशावर ठाकरे सरकारनंही शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय.. राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी परवानगी बंधनकारक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्याचं समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातील बैठकीत हा निर्णय झाला आहे.
दरम्यान, सर्व जिल्हा पोलिस प्रमुखांसोबत पोलिस महासंचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीत धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी अनिवार्य करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
गृहमंत्र्यांचे आदेश
भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक व मुंबईचे पोलिस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं.. कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेशही वळसे पाटलांनी दिला आहे.
ते म्हणाले, की “पोलिस महासंचालक व मुंबईचे पोलिस आयुक्त एकत्र बसून, याबाबत एक निर्णय घेतील.. त्यासाठीच्या ‘गाईडलाईन्स’ तयार करतील.. पुढील एक-दोन दिवसांत राज्यासाठी एकच असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल नि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल..”
“राज्यात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणी असा प्रयत्न केला, त्यात तो दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, मग ती कोणतीही संघटना असो, व्यक्ती असो वा आणखी कोणीही..” असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे..
नाशिक पोलिस आयुक्तांचा आदेश
नाशिकमध्ये सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच ‘अजाण’पूर्वी 15 मिनिटं आधी आणि 100 मीटर अंतरावर ‘हनुमान चालीसा’ लावता येईल, असे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी काढला आहे..

