सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/ जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रितू या २०१८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. गृह विभागाने राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये रितू यांचा समावेश आहे. राज्याच्या गृह विभागाने रात्री उशिरा बदलीचे आदेश पारित केले.
सांगलीच्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची सातारा येथे बदली झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीचे अप्पर अधीक्षकपद रिक्त होते. सध्या इचलकरंजीचे अप्पर अधीक्षक यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पदभार दिला होता . रितू खोकर या लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत. सांगलीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करून आपली छाप पाडलेले २०१९ च्या बॅचचे नित्यानंद झा यांची गोंदियाच्या अप्पर अधीक्षक पदी तर मिरजेत गुटखा अड्डा उध्वस्त करणारे आदित्य मिरखेलकर यांची नाशिक ग्रामीणच्या अप्पर अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

