अर्जुन चव्हाण असे मृत तरुणाचे नाव..!
Mumbai Police : मालाडमधील अंबोजवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. ११) घडला. अर्जुन चव्हाण असे तरुणाचे नाव असून तो सोलापूरमध्ये रिक्षाचालक होता.आरोपी गोविंद चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर अर्जुनच्या मृत्यूने धक्का बसलेल्या संतप्त रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अर्जुन आणि गोविंद दोघेही एकाच समाजातील क्षुल्लक मुद्द्यांवरून वारंवार भांडण करायचे. सोमवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा गोविंदने अर्जुनवर चाकूने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी गोविंदविरोधात मालवणी पोलिसांकडे अनेक तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

