पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याविरोधात देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि एनडीए यांच्याविरोधात एक पर्याय उभा करावा यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्टला मुंबईत बोलावण्यात आली आहे. पण इंडिया आघाडीच्या या बैठकीआधीच बिघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण दिल्लीत पुन्हा काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. दिल्लीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर बैठकीला जायचं कशाला? अशी चर्चा आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडत आहे. त्याप्रमाणे दिल्लीतील 35 पदाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत आपसोबत आपण युती करायला नको. लोकसभा निवडणूक आपण स्वबळावर लढवुया. त्यानंतर गरज भासली तर आपसोबत युती करुया. सरकार बनवताना गरज लागली तर युती करुया, असा सूर या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा होता.
आम आदमी पक्षात हालचाली..
या बैठकीनंतर दिल्लीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी आप पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्याचे पडसाद लगेच आम आदमी पक्षाच्या गोटात बघायला मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत काँग्रेस आपल्याला सोबत घेणार नसेल तर इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत कशाला जायचं? असं आम आदमी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीत बिघाडी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक..
इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याआधी बंगळुरुत इंडिया आघाडीची दोन दिवसांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आघाडीचं नाव ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबईतल्या बैठकीत आघाडीचे समन्वयक ठरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांकडून विशेषत: महाविकास आघाडीकडून बैठकीसाठी जोरदार तयारी सुरु असताना आता आघाडीत बिघाडीच्या चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत जायचं की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय आपचे प्रमुख अरविंद केजरीवार हे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.