मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला दुष्काळी घोषित करण्याची मागणी करत आमदार विक्रम सावंत, आमदार राजू आवळे, आमदार संजय जगताप यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला. त्यांनी स्वत: देखील विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला.
जत तालुका दुष्काळी जाहीर करा… पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करा… जत तालुक्याचं त्रिभाजन करा… जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून द्या… विस्तारीत म्हैसाळ योजनेचं काम लवकरात लवकर करा… अशा मागण्यांचे फलक हाती घेऊन आंदोलक आमदारांनी जतमधील दुष्काळी परिस्थितीकडं लक्ष वेधलं.
जयंत पाटील यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. ‘जत हा दुष्काळी भाग आहे. इथल्या ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतेच, त्यात यंदा अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. पाण्याची तीव्र टंचाई गांभीर्यानं घेत या भागात पाण्याची टँकरची व्यवस्था केली पाहिजे. तसंच, इतरही महत्वाच्या उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली. ‘या भागातील काही गावं आम्हाला कर्नाटकात पाठवा अशी मागणी करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं यात वेळीच लक्ष घालावं, असंही जयंत पाटील म्हणाले.

