शेतकऱ्याला झाले कळायचे बंद
शेतकऱ्यांना कोणी वाली आहे कि नाही?
कडेगाव :- ऑनलाईन ई पीक पाहणी करता येत नसल्याने तलाठयाकडे आपल्या पिकाची ऑनलाईन ई पीक पाहणी नोंद करून मिळावी म्हणुन गेलेल्या शेतकऱ्याला चक्क दहा हजाराची मागणी तलाठयाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्याला नक्की काय करावे हेच समजेना असं झालं. कडेगाव तालुक्यातील एका बदलीचा आदेश निघालेल्या तलाठयाच्या या मागणीने, तलाठयांना नक्की झालंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे तर तालुक्यात शेतकऱ्यांना नक्की कोणी वाली आहे कि नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कडेगाव तालुक्यात इमानदारीने सर्वसामान्य जनता आपला केंद्र बिंदू मानून कामकाज करणारे अनेक तलाठी आहेत, मात्र काही भ्रष्ट कारभार करण्याची सवय लागलेल्या लोकांमुळे संपूर्ण प्रशासनास तोंड लपवण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे. एकीकडे शासन व प्रशासन ई पीक पाहणी साठी जनजागृती करीत असताना तसेच शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वरून ई पीक पाहणी करण्याचं आवाहन करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील एका गावात मोबाईल वर ई पीक पाहणी करता येत नसल्याने बदलीचा आदेश झालेल्या एका तलाठयाकडे गेलेल्या शेतकऱ्याला पीक पाहणीची नोंद करण्यासाठी चक्क दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती खबऱ्याला मिळाली आहे. यावरून भ्रष्ट तलाठयांनी नक्की काय चालवलं आहे याची फक्त कल्पना केलेलीच बरी.कार्यभार सोडण्यासाठी काहीसा अवधी शिल्लक राहिला असताना सुद्धा एखादा तलाठी एवढं धाडस कसं काय करू शकतो?.भ्रष्ट कारभार करणाऱ्या लोकांच्यावर कोणी अंकुश ठेवणार आहे कि नाही किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी वाली आहे कि नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही निवडक लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण प्रशासनास तोंड लपवण्याची वेळ येत असल्याने अशा भ्रष्ट लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनते बरोबरचं महसूल कर्मचाऱ्यांमधून सुद्धा होतं आहे.

