कडेगाव :-कडेगाव आणि पलूस तालुक्यात काही तलाठयांनी जाणीवपूर्वक आर्थिक अमिषापोटी दुबार नोंदी धरण्याचा सपाटा लावला आहे. पलूस तालुक्यात काही नोंदीमध्ये तक्रारी होऊन रद्द झालेल्या असताना सुद्धा भ्रष्ट कारभार करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्या आहेत अशा प्रकरणामध्ये संबंधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे अशा पीडित शेतकऱ्यांनी तक्रार घेऊन आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष व आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी केलं आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी हि मोठी संधी आहे.
दुबार नोंदी बाबत गोपनीय खबऱ्याने सडेतोड वृत्तांकन केल्यानंतर आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी माहिती घेत मोहिते वडगाव येथील दुबार नोंदीचे प्रकरण शोधून काढत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्याकडे कारवाई संदर्भात निवेदन दिलं. यावर आता प्रांताधिकारी डॉ देशमुख यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता दुबार नोंदी बाबत पलूस तालुक्यात हि बऱ्याच घटना घडल्या असल्याचे कानावर आल्याने डी एस देशमुख यांनी पीडित शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे. गोपनीय खबऱ्याशी बोलताना देशमुख म्हणाले, ” दुबार नोंदीच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांवर महसूल प्रशासनातील भ्रष्ट लोकांकडून अन्याय झाला आहे अशा शेतकऱ्यांनी कागदपत्र घेऊन संपर्क साधावा. संबंधितांना न्याय देण्यासाठी आपण वेळ प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेऊन न्याय मिळवून देऊ तसेच दोषींना ही शिक्षा व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. “एकूणच डी एस देशमुख यांनी आपला मोर्चा आता पलूस तालुक्याकडे वळवला असून शेतकऱ्यांनी संपर्क साधून माहिती द्यावी.

