पुणे : “राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करावा, हिच आमची भुमिका आहे. त्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारला पत्र दिले आहे. लोकसभा व विधानभा निवडणुकीच्यापुर्वी समान नागरी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे.” असे ठामपणे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी भाजपची आगामी निवडणुकांमधील दिशा स्पष्ट केली.
भाजपकडून “मोदी@9 ‘ आणि “संपर्क ते समर्थन अभियान’अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्ते, नागरीक व संस्थांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. त्याअंतर्गत बावनकुळे यांनी शुक्रवारी “सकाळ’ कार्यालयास भेट दिली. “सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस व कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. यावेळी बावनकुळे यांच्याशी “सकाळ’च्या सर्व आवृत्यांच्या संपादकांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.
“भाजप 51 टक्के मते मिळवेल असे चित्र नाही, त्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अन्य घटकांना बरोबर घेणार का ? या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, “”भाजपला राज्यात 51 टक्के मते प्राप्त करण्याच्या लढाईसाठी भर घालावी लागेल. एकीकडे संघटनात्मक बांधणी करतानाच, दुसरीकडे मित्र पक्षांनाही बरोबर घेत आहोत.
महादेव जानकर, सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे. प्रस्थापितांविरुद्धचे वातावरण कसे आहे, हे शोधावे लागेल. सरकारचे काम जेवढे वाढेल, त्याचा फायदा पक्षाला होईल. जिथे आम्ही अपुर्ण आहोत, तिथे भर घालण्याची आमची योजना तयार आहे.अनेक योजना लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत नेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्पही आम्हाला बळ देईल.”
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, त्यासाठी मित्रपक्षांची बैठक घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेबाबत बावनकुळे म्हणाले, “”शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये यायची इच्छा असेल तर त्यांना प्रवेश दिला जाईल.
त्यापुर्वी शिंदे यांच्याशी नक्कीच चर्चा केली जाईल. निवडणुकीपुर्वी तिथली जागा आणि ताकद यांचा अंदाज घेऊन आम्ही त्या चिन्हावर निवडणुक लढवू. मात्र युतीच्या धर्म पालनासाठी एकमेकांचे विचार नक्कीच ऐकून घेतले जातील.”

