कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील भोंगे उतरावेच लागतील, असे सांगतानाच ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता तशा झोपडपटय़ांतील मदरशांवर धाडी टाका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना केली.
दोन वर्षांनी कोरोना संकट ओसरल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला किरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, असा प्रश्न करत मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्याची मागणी केली. तसे झाले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे स्पीकर लावावे लागतील, असे राज ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आमदारांना मोफत घरे देण्यात येऊ नयेत. तसेच आमदारांना देण्यात येणारी पेंशन बंद करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. नाशिक महानगरपालिकेत मनसेने चांगले काम करूनही पुन्हा सत्ता मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करा
महाराष्ट्राला संत, महंत, महापुरुषांची परंपरा आहे. शिवजंयती साजरी केली तशी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही त्याच उत्साहाने करावी. महाराष्ट्राच्या ज्या महापुरुषांनी देशाला मोठे केले त्यांच्या जयंती उत्साहात साजऱया करा आणि देशाला कळू द्या, महाराष्ट्र जिवंत आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करणाऱया राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारचे मात्र कौतुक केले. मला आनंद होतोय की, उत्तर प्रदेशचा निकाल लागला आणि कळलं की उत्तर प्रदेशात विकास होतोय. हेच तर पाहिजे, असे सांगतानाच लवकरच अयोध्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

