कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यात कृषी विभागाच्या कथित पथकाच्या धाडींनंतर अब्दुल सत्तार एकाकी पडल्याचं चित्र आहे.
राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण देखील ऐकून घेतलं नसल्याची माहिती आहे. बोगस बियाणे आणि खत विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून छापेमारी करताना खासगी व्यक्तीची मदत घेतल्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप आहे.
खासगी व्यक्ती छापे कसे टाकू शकतात, अशी विचारणाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहेत.
काय आहे प्रकरण?
अकोल्यातील एमआयडीसीमध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकामध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळींचा देखील समावेश असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर सरकारी पथकाच्या धाडीत खासगी व्यक्तीचा समावेश कसा होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होत होता.
अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं की, दिपक गवळी माझा पीए नाही तर तो कृषी अधिकारी आहे. कृषी विभागाच्या पथकात खासगी व्यक्ती नाहीत. ४२ अधिकारी पथकात होते. दीपक गवळीचा काही दौऱ्यामध्ये माझा पीए असल्याचा उल्लेख झाला आहे.

