उदगाव (ता. शिरोळ) ते अंकली (ता. मिरज) दरम्यान कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठय़ा पुलाजवळ वादळी वाऱ्याने 6 झाडे पडली. यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्ग तब्बल चार तास ठप्प झाला.
यामध्ये 100हून अधिक एसटी बसेस व एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. अखेर जयसिंगपूर पोलिसांच्या प्रयत्नांनंतर झाडे बाजूला काढून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहतूक खुली झाली. या वाहतूक ठप्प आणि उन्हामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
आज दुपारी अडीचच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. यात उदगाव (ता. शिरोळ) ते अंकली (ता. मिरज) दरम्यान कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठय़ा पुलाजवळ वादळी वाऱ्याने सहा मोठी झाडे पडल्याने सांगली- कोल्हापूर महामार्ग ठप्प झाला. त्यानंतर उदगाव ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल 6 किलोमीटर, तर सांगलीकडील बाजूला 5 किलोमीटर, तर मिरजकडील बाजूस 4 किलोमीटर तसेच उदगाव ते तमदलगे बायपास मार्गावर तब्बल जैनापूरपर्यंत वाहतूक ठप्प झाली.
घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो. कॉ. सचिन चौगुले, कांशीराम कांबळे, वैभव सूर्यवंशी, गुलाब सनदी, किजय मगदूम, विशाल खाडे यांच्यासह इतर दाखल होऊन तत्काळ पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. त्यानंतर पाचच्या सुमारास जयसिंगपूर पोलिसांनी वाहतूक सोडण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल दोन तास वाहतूककोंडी निघाली नव्हती. त्यामुळे मिरजकडे जाणारी वाहने उदगाव-चिंचवाड-अर्जुनवाडमार्गे सोडण्यात आली.
या वाहतूककोंडीमुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर यात मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, विजापूर यांसह इतर 100हून अधिक एसटी बसेस अडकून पडल्या होत्या. शिवाय रुग्ण नेणारी रुग्णवाहिका अडकून पडल्याने पोलिसांनी अनेक प्रयत्न करून रुग्णवाहिका रवाना केली.

