सांगली – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल बांधणीवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजित कदम यांच्यासह भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यासमवेत गुप्त चर्चा सुरू केल्याची कुजबूज सुरू आहे.
त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे तासगावचे नेते सुरेश पाटील आणि कवठेमहांकाळचे शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटातून ‘ही कसली महाविकास आघाडी,’ अशी खदखद व्यक्त होत आहे. त्याविरोधात नव्याने मोट बांधण्याची खलबतेही सुरू झाले आहेत.
सहकारी संस्थांमध्ये पक्षाचे जोडे बाहेर काढायचे आणि परिस्थितीनुसार उभ्या-आडव्या आघाड्या करायच्या, ही परंपरा भाजप ताकदवर होत नाही, तोवर सुरू होती. आता भाजपची ताकद वाढली आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे धूमशान सुरू आहे. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) एकत्र राहतील का, याबाबत राज्यभरात उत्सुकता आहे.
बाजार समित्यांतील हालचालींकडेही त्यादृष्टीने पाहिले जात आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजप नेत्यांना जवळ करू पाहत आहेत का, या मुद्दा खदखदीच्या केंद्रस्थानी आला आहे. जयंतरावांचे आणि खासदार संजय पाटील यांचे चांगले संबंध आहेत. जिल्हा बँकेच्या याआधीच्या निवडणुकीत त्यांची आघाडी होती. विश्वजित कदम यांचेही संजय पाटील यांच्याशी राजकारणापलीकडचे सख्य आहे. हे ‘सख्य’ पॅनेलमध्ये बदलले तर काँग्रेसमधील वसंतदादा गट बाजूला पडणार आहे. तोच कळीचा मुद्दा बनला आहे.
या स्थितीत कोंडी झाली तर पर्याय म्हणून विशाल पाटील यांनी जतचे भाजपचे नेते विलासराव जगताप यांच्यासह अजितराव घोरपडे, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्याशी संपर्क ठेवत नव्या मांडणीच्या दिशा खुल्या ठेवल्या आहेत.
जयंत पाटील यांच्या पॅनेलविरोधात सक्षम पॅनेल द्यावे, याबाबत या नेत्यांचे सावध एकमत आहे. त्याचवेळी ‘महाविकास आघाडी’ या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर जयंत पाटील, विश्वजित आणि विशाल आणि घोरपडे यांची एकी झाली तर काय, हा आता भाजप नेत्यांपुढचा कठीण प्रश्न असेल. अशा वेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासाठी आव्हानाची स्थिती असेल. पालकमंत्री सुरेश खाडे एरव्ही या रिंगणाबाहेरच राहिलेले आहेत. यावेळी ते महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनाही लक्ष घालावे लागू शकते. या घडीला महाविकास आघाडी आणि भाजप या पातळीवर अस्वस्थता वाढत निघाली आहे.

