केंद्र व राज्य शासनाचा सोसायटी हायटेक उपक्रम
कडेगाव:- केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने विकास सोसायटया हायटेक करण्याचा उपक्रम हाती घेतला असून सांगली जिल्ह्यातील ४२७ विकास सोसायट्यांची निवड या उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये सोसायट्यांना संगणक, प्रिंटर आणि राउटर दिला जाणार आहे मात्र कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील विकास सोसायटी शासनाच्या या उपक्रमाबाबत एक पाऊल पुढंच आहे असं म्हणावं लागेल कारण २०११ पासून नेवरी सोसायटीचे सर्व व्यवहार खतावणी बरोबरच संगणकीय चालू आहेत.
प्रकल्पात प्रामुख्याने विकास संस्थांचे संगणकीकरण करणे, मनुष्यबळास प्रशिक्षित करणे व विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. त्यासाठी प्रति विकास सोसायट्यांना ३ लाख ९१ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, हा भार केंद्र व राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी केंद्राचे ३०७.७४ कोटी (६०.७३ टक्के), राज्याचे १५३.२५ कोटी (२९.२५ टक्के) आणि नाबार्डचे ८.६५ (१०.०२ टक्के) याप्रमाणे एकूण ४६९ कोटी ६४ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.
जिल्हा बँकांकडून पीक कर्ज घेणे व पुढे सभासद शेतकऱ्यांना वाटप करण्यापुरत्या कार्यरत विकास सोसायट्यांमध्ये आता दैनंदिन कामकाजाची पद्धतच बदलून त्याची जागा संगणक, प्रिंटर, राऊटरच्या वापरातून हायटेक व्यवसायभिमुख होणार आहेत. गावातील सोसायट्यांचे कामकाज दिल्लीत बसून पाहण्यासाठी ही पावले केंद्र व राज्याच्या संयुक्त प्रयत्नातून उचलण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यांतील चार हजार विकास सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे मात्र नेवरी विकास सोसायटी २०११ पासूनच हायटेक करण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी आणि उपाध्यक्ष वसंत महाडीक यांनी सोसायटी मध्ये संगणक ,प्रिंटर बसवून सर्व व्यवहार खतावणी मध्ये नोंदवण्याबरोबर संगणकीय पध्दतीने सुरू केले होते त्यासाठी संगणक ऑपरेटर ची ही नेमणूक करण्यात आली. तेच संगणकीय व्यवहार आजअखेर दोन्ही पध्दतीने सुरू आहेत.
शासनाच्या हायटेक उपक्रमाने नेवरी सोसायटी चे व्यवहार ऑनलाइन होतील मात्र ते हायटेक २०११ पासूनच झाले आहेत. त्यामुळं नेवरी सोसायटी शासनाच्या एक पाऊल पुढं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

